अंबरनाथमध्ये सापडला कोरोनाचा रूग्ण, बुवापाडा सील

अंबरनाथ पश्चिमेकडील बुवापाडा येथे राहणाऱ्या एका पन्नास वर्षीय व्यक्तीची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. हा रुग्ण १८ मार्चला उत्तर प्रदेशातून मुबईत आपले उपचार करण्यासाठी आला होता. या रुग्णाला मधुमेह आणि हृदयरोग असल्यामुळे त्यावर उपचार करण्यासाठी त्याला मुबईतील शासकीय रुग्णालयात २६ मार्च पासून दाखल करण्यात आले होते. या दरम्यान त्याची तपासणी केली असता २ एप्रिल रोजी तो कोविड १९ पॉझिटीव्ह संक्रमित असल्याचे निदान झाले. त्यानंतर त्याचा २० वर्षीय मुलाची देखील तपासणी केली असून तो निगेटिव्ह आला आहे. त्यांच्या घरात रुग्णाची पत्नी आणि तीन मुले राहत आहेत. सदर माहिती अंबरनाथ पालिका प्रशासनास मिळताच रुग्ण राहत असलेल्या भागाजवळचा दीड किलोमीटरचा भाग बंद केला आहे. सदर भागात आरोग्य विभागाकडून तपासणी सुरू आहे. पोलिसांनी याभागात कडेकोट बंदोबस्त ठेवला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी नागरिकांना अफवा पसरवू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल असे निर्देश दिले आहेत. तर मुख्याधिकारी देविदास पवार यांनी पालिका यंत्रणा सतर्क असल्याचे सांगितले आहे. नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांनी सदर भागातली साफसफाई आणि औषध फवारणी वेळोवेळी होत असल्याचे सांगितले.